Uttar Pradesh Coaching Class Blast : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात शनिवारी एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर सहा विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला आणि धुराचे लोट पसरले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित होते.
कादरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनपूर मंडी रोडवरील एका कोचिंग सेंटरमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात धकधकीची स्थिती निर्माण झाली. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवले गेले. त्यातील दोन विद्यार्थ्यांना मृत घोषित करण्यात आले, तर बाकी जखमींच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना सैफई मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आले आहे.
प्रारंभिक तपासानुसार, सेप्टिक टँकमध्ये जास्त प्रमाणात गॅस जमा होऊन मीथेन गॅसच्या स्फोटामुळे हा हादसा झाला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, कोचिंग सेंटरमधील सर्व रेकॉर्ड तपासले जात आहेत.