अखेर लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम पुन्हा जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता. परंतु, आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली आहे. पात्र महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात झाली असल्याची मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. १२ लाख ८७ हजार बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसंच, आधार प्रमाणीकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले, त्यांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.