सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झाला. पाच जणांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी ही क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन (Solapur Hyderabad Highway) जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील (Dharashiv news) अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली. (Road Accident news)
अपघात झाल्यानंतर आजुबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. काही नागरिकांनी जोर लावून क्रुझर गाडी सरळ करुन त्यामधून मृतदेह बाहेर काढले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये सात ते आठजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे. या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असल्याचे समजते.
या गाडीचे टायर्स फुटल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन एका ट्रॅक्टरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जबर धडकेमुळे गाडीत बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. काही नागरिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढून बाहेर रस्त्यावर ठेवले आण त्यानंतर गाडी सरळ करुन इतर जखमींना बाहेर काढले. सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. अपघाताच्यावेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक कोंबून बसवले होते. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू आणि तब्बल 8 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.