बीड जिल्ह्यातील अमळनेर परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर थरारक हिंसाचाराच्या घटनेत झाले. यात पाच जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. उभ्या पिकात ट्रॅक्टर नेल्याच्या वादातून लाठ्या, कुऱ्हाडींनी संतप्त हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात दोन वृद्धांसह एक महिला आणि आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेने अमळनेर गाव हादरून गेले असून, परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, अंमळनेर पोलीस ठाण्यात नितीन सानप, कृष्णा मिसाळ या प्रमुख आरोपींसह पाच आरोपींविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
जमिनीवरील वाद म्हणजेच शेतात ट्रॅक्टर का घातला या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. किरकोळ वाद विकोपाला जाऊन थेट प्राणघातक हल्ल्यात परिवर्तित झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.