कराड तालुक्यातील वाठार गावात गुरुवारी घडलेली हृदयद्रावक घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारी ठरली आहे. अंगणात खेळणारी पाच वर्षांची निष्पाप संस्कृती रामचंद्र जाधव अचानक बेपत्ता झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह गावातील शिवारात आढळून आला. गळा दाबून तिचा निर्घृण खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
अंगणातील खेळ संपला मृत्यूने
गुरुवारी संध्याकाळी संस्कृती घराजवळच्या अंगणात खेळत होती. काही क्षणांतच ती गायब झाली. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी गावात शोधाशोध सुरू केली. मात्र, काहीच छडा लागला नाही. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री ड्रोनच्या सहाय्याने शिवारात आणि महामार्गाच्या आसपास शोध घेण्यात आला.
पहाटे पाच वाजता आढळला मृतदेह
पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथकांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवले. शुक्रवारी पहाटे, एका शेतात संस्कृतीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरून मृतदेह कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा आहे.
सोळा वर्षीय मुलीसह दोघे ताब्यात
या घटनेने संपूर्ण गाव हदरले असताना, पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत एका सोळा वर्षीय मुलीसह आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीतून खुनामागील कारण उघड होण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
गावात शोककळा, न्यायाची मागणी
संस्कृतीच्या मृत्यूने संपूर्ण वाठार गावात शोककळा पसरली आहे. गावकरी संतप्त असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.