थोडक्यात
भारत-पाकिस्तान आशिया कप अंतिम सामन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर PVR सिनेमाने आपल्या निर्णयात बदल
महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये हा सामना थेट दाखवला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
India vs Pak Final 2025 : भारत-पाकिस्तान आशिया कप अंतिम सामन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर PVR सिनेमाने आपल्या निर्णयात बदल करत महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये हा सामना थेट दाखवला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
याआधी PVR ने देशभरात 100 हून अधिक स्क्रिन्सवर भारत-पाकिस्तानचा सामना दाखवण्याची घोषणा केली होती. मात्र, पाकिस्तानने अलीकडेच पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे किंवा त्याचे प्रक्षेपण करणे म्हणजे शहिदांचा आणि विधवांचा अपमान आहे, असा ठाम आरोप ठाकरे गटाने केला. या विरोधानंतरच PVR ने महाराष्ट्रात सामना न दाखवण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना (ठाकरे गट) ने PVR ला थेट इशारा देत सामना दाखवणे म्हणजे देशद्रोह असल्याचं म्हटलं होतं. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया देत, “क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही. सामना दाखवल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,” अशी मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरण अधिक चिघळले होते.
शेवटी PVR च्या प्रोग्रामिंग आणि ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसोझा यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून महाराष्ट्रात सामना न दाखवण्याचा निर्णय कळवल्याची माहिती पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी दिली.
आता अंतिम सामना महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार नसला तरी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर प्रसारण होणार आहे. मात्र या वादामुळे भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच राजकीय रंग चढला आहे.