मुंबईतील सर्वात मानाच्या गणपतींपैकी लालबागच्या राजाचे विसर्जन यंदा मोठ्या वादात सापडले आहे. जवळपास 33 तास चाललेल्या या विसर्जन सोहळ्याला समुद्रातील भरतीमुळे मोठा विलंब झाला. गुजरातहून आणलेल्या आधुनिक तराफ्यावर विसर्जनाचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात अडचणी आल्याने भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. इतकंच नव्हे तर, विसर्जनाची प्रक्रिया चंद्रग्रहणाच्या वेळेत झाल्याने अनेक भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या.
या प्रकरणानंतर अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवत गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. समितीने चार ठळक मागण्या मांडल्या असून, यात कार्यकर्त्यांच्या वागणुकीची चौकशी, फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच विसर्जन प्रक्रियेतील बदल यांचा समावेश आहे. समितीचे म्हणणे आहे की, दर्शनासाठी येणाऱ्या सामान्य भक्तांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत आहे, तर व्हीआयपी संस्कृतीमुळे सर्वसामान्य भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
इतिहासाचा दाखला देत समितीने आठवण करून दिली की, लालबागच्या राजाची स्थापना 1934 मध्ये कोळी समाजातील महिलांनी केली होती. त्यांच्या श्रद्धा-नवसामुळेच हा उत्सव उभा राहिला. परंतु आज मंडळातील काही कार्यकर्त्यांनी मूळ परंपरा आणि कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली विसर्जनाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कोळी बांधवांचा मान पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी समितीने केली आहे.
तक्रारीत व्हीआयपी दर्शनासाठी फक्त एक दिवस राखून ठेवावा, तसेच चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पंडाल मोकळा ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कोळी समाजासाठी एक दिवस राखून ठेवावा आणि विसर्जनात कोळी बांधवांचा पारंपरिक सहभाग कायम ठेवावा, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला आहे.
ईमेलमधील शेवटचा सूर अत्यंत तीव्र होता. “गणपती हा कोणाच्याही मालकीचा नसून सर्वांचा आहे. श्रीमंतीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज चढला आहे. त्यामुळेच बाप्पांनीच जणू विसर्जन कोळी बांधवांच्या हस्ते करून घेतले,” असे विधान करत समितीने कार्यकर्त्यांच्या वागणुकीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.