सर्व लहान मोठे हॉटेल्स विविध ढाबे त्याचबरोबर लहान मोठे खानावळ आणि सर्व अन्न व्यावसायिकांनी जर अन्न सुरक्षा नियमांचे पालन जर केले नाही तर त्यांच्यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे. वेळोवेळी अन्न प्रक्रियेची आणि साठवणीची तपासणी केली जाणार असुन दोषींना कडक शिक्षा मिळणार असुन त्यांचे परवाने ही रद्द करणार असल्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले आहे.
यामुळे भेसळयुक्त पदार्थ आणि साठवणीची अयोग्य पद्धतीचा अवलंब करणाऱ्या सर्व अन्न व्यावसायिकांना हा धोक्याचा इशारा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिला आहे. अन्न सुरक्षा ही एक सामाजिक जबाबदारी आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थ शिजवण्याची प्रक्रिया वेगळी असावी, शाकाहारी अन्नपदार्थाची व मांसाहारी पदार्थांची योग्य साठवणूक करावी , चांगल्या प्रतीचे अन्न वापरावे , योग्य स्वच्छता ठेवावी या बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास परवाना रद्द,करण्यात येणार असुन दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आणि भारतीय अन्न व सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नसुरक्षा व प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर विविध प्रकारचे कार्यक्रम आणि जनजागृतीपर मोहीम राबवली जाणार आहे. तसेच लहान मोठे हॉटेल्स विविध ढाबे त्याचबरोबर लहान मोठे खानावळ आणि सर्व अन्न व्यावसायिकांचे दुकाने कार्यालय यांची नियमित तपासणी केली जाणार असुन तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही Food Safety Connect App च्या माध्यमातून आपली कोणतीही तक्रार नोंदवावी. किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा https://fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त श्री. नार्वेकर यांनी सांगितले आहे.