राज्यातील महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्यात महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. यावेळी बहुतांश नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली. मात्र आज, मंगळवारी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेता आणि ओबीसीचा चेहरा असलेले छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिपदातील समावेशामुळे आता नाशिक जिल्ह्याला चार मंत्रिपदं मिळाली आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच नाशिकला चार मंत्री मिळाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात यापूर्वी नाशिकचे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी, दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण तर नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. आता या तिघांच्या यादीत छगन भुजबळ यांचेही नाव जोडले गेले आहे. शिवाय भुजबळांना कोणतं खातं देण्यात येईल, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात असल्याचे समजते.