भारतीय माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी क्रिकेटनंतर आता राजकारणातील इनिंग सुरू केली आहे. त्यांनी मंगळवारी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महसूल मंत्री व भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार अतुल भोसले, आमदार समाधान आवताडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील एका कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. केदार जाधवने गेल्या वर्षाच्या जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. याबाबतची माहिती त्याने सोशल मीडियावर सार्वजनिक केली होती. केदार जाधवने त्याचा शेवटचा सामना फेब्रुवारी महिन्यात न्यूझिलंडविरुद्ध 2020 साली खेळला होता.
यावेळी केदार जाधवसह सांगली, सातारा आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला. मनसे सांगली जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात तासगाव कवठे महांकाळ विधानसभा क्षेत्रातील तालुकाध्यक्ष कुमार जाधव आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, उबाठा गटाचे मनोज चव्हाण, प्रहार शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष रणजीत ज्ञानदेव माने आणि कार्यकारिणी सदस्य जितेंद्र पांडुरंग माने आदी प्रमुख पदाधिकारी, मलकापूर नगरपालिकेचे माजी सभापती शंकरराव (आप्पा) चांदे, मलकापूर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत चांदे, सतिष चांदे, धनाजी देसाई यांच्यासह कराड दक्षिण व मलकापूर विधानसभा मतदारसंघातील (जि. सातारा) काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, वसमत विधानसभा मतदारसंघातील (जि. हिंगोली) माजी नगराध्यक्ष शशीकुमार कुल्थे, मुरली कदम, माधवराव बाबुराव काकडे, संजय शिरसागर आदी उबाठा गटाचे प्रमुख पदाधिकारी; तसेच काँग्रेस कमिटीचे वसमत तालुका उपाध्यक्ष कामनराव मुळे, हिंगोली काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम आदी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश घेतला.