अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, अमेरिकेत विक्रीसाठी असलेले आयफोन अमेरिकेतच तयार व्हावेत. भारत किंवा इतर कोणत्याही देशात त्यांची निर्मिती झाल्यास, त्यावर किमान 25 टक्के टॅरिफ लावले जाईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, "मी ॲपलचे सीईओ टीम कूक यांना पूर्वीच सांगितले होते की, अमेरिकेतील बाजारात विकले जाणारे आयफोन देशातच तयार झाले पाहिजेत. भारतासह इतरत्र उत्पादन झाल्यास त्यावर कर आकारला जाईल."
ही भूमिका ट्रम्प यांनी अशा वेळी घेतली आहे जेव्हा ॲपलने भारतात आयफोन उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. 2024 मध्ये अमेरिकेत एकूण 7.59 कोटी आयफोनची विक्री झाली होती, यातील तब्बल 31 लाख आयफोन मार्च महिन्यात भारतातून निर्यात करण्यात आले होते. भारताचे आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते की, गेल्या आर्थिक वर्षात भारतातून जवळपास दीड लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात करण्यात आले.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ॲपलच्या उत्पादन धोरणावर आणि भारतातील गुंतवणुकीवर काय परिणाम होईल, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.