भारत आणि अमेरिकेतील आर्थिक संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफचा इशारा देत कठोर भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी भारताविषयी तीव्र विधानं केली आणि टॅरिफच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिल्याचा दावा केला.
ट्रम्प यांनी सांगितले की, “मी हुकूमशहा नाही तर संयमी नेता आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणात मी थेट हस्तक्षेप करून मोठे युद्ध टाळले. त्या काळात सात विमानं पाडली गेली होती आणि काही तासांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता होती, मात्र मी ते थांबवले.” त्यांनी पुढे नमूद केले की, या संघर्षाला थांबवण्यासाठी टॅरिफचा प्रभावी वापर केला गेला.
त्यांचा ठाम दावा आहे की, टॅरिफमध्ये मोठी ताकद दडलेली आहे आणि जगाला याची खरी जाणीव अजून झालेली नाही. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले. हा निर्णय भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
रशियाकडून भारत करत असलेली तेल खरेदी हा वादाचा प्रमुख मुद्दा ठरत आहे. अमेरिकेच्या नाराजीची पर्वा न करता भारताने रशियन तेल आयात सुरूच ठेवली आहे. त्याचबरोबर भारत देखील अमेरिकन कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात जपान दौर्यावर जाणार असून, तेथे महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे भारत-अमेरिका संबंधात आणखी तणाव निर्माण होऊ शकतो.