थोडक्यात
लडाखच्या आंदोलनाला हिंसक वळण
हिंसाचारात चार ठार, ५९ जखमी
लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी
(Leh Ladakh protest) लडाखच्या लेहमध्ये बुधवारी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला तर 59 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 22 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने संचारबंदी लागू केली. केंद्र सरकारने या हिंसाचारासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे.
लडाखला राज्याचा दर्जा आणि सहावे अनुसूची लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही आठवड्यांपासून विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या 35 दिवसांपासून 15 जण उपोषणावर बसले होते. मंगळवारी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे संताप वाढला आणि युवकांनी बुधवारी बंदचे आवाहन करून मोठा मोर्चा काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते अडीच हजार युवक रस्त्यावर उतरले. भाषणे सुरू असतानाच काही गटांनी घोषणाबाजी करत तोडफोड केली. यात काही वाहने जाळण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. या घटनेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडत दु:ख व्यक्त केले. त्यांनी शांततेच्या मार्गाने गेली पाच वर्षे आंदोलन केले तरी ठोस निकाल लागला नाही, मी तरुण पिढीला शांततेच्या मार्गाने सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन करतो. मी लडाखच्या तरुणांना आवाहन करतो की त्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू नये.असे वांगचुक म्हणाले
सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. सहा ऑक्टोबरला नियोजित असलेली बैठक पुढे आणून 25 व 26 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये लडाखला राज्याचा दर्जा, सहावे अनुसूची लागू करणे, लेह व कारगिलसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि स्थानिकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण यांचा समावेश आहे.