विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एक गंभीर अपघात घडला. स्वामी समर्थ नगरमधील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील चौथ्या मजल्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, अजूनही 20 ते 25 लोक मलब्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) आणि वसई-विरार महापालिकेची अग्निशमन टीम दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉडच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत जोयल कुटुंबातील एका लहान मुलीचा वाढदिवस सुरू होता. दुर्दैवाने त्या चिमुरडीचा आणि तिच्या आईचा यात मृत्यू झाला आहे, तर वडील बेपत्ता आहेत. तसेच चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर, त्यांची पत्नी सुपरीला आणि मुलगा अर्णव यांच्याशीही अद्याप संपर्क साधता आलेला नाही.
स्थानिक रहिवाशांच्या मते, अपार्टमेंटची स्थिती अनेक दिवसांपासून जीर्ण झाली होती. महापालिकेने यापूर्वी इमारतीबाबत ऑडिट करण्याची नोटीस दिली होती. परिसर दाट वस्तीचा असल्यामुळे जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. सध्या इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली असून, मलबा हटवून अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.