नेपाळमध्ये पुन्हा अस्थिरता वाढली असून अनेक भागांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. काही ठिकाणी तरुणांचे आंदोलन उग्र झाल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. वाढत्या हिंसाचारामुळे बुद्ध एअरने देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. 8–9 सप्टेंबरला पोलिसांच्या गोळीबारात 21 जणांचा मृत्यू झाल्यापासून असंतोष वाढत आहे. जवळपास 70 दिवसांनी परिस्थिती पुन्हा चिघळली असून भारतीय सीमेजवळील बारा जिल्ह्यातील सेमरा परिसरात 19–20 नोव्हेंबरला संचारबंदी लागू करावी लागली.
जेन-झेड समर्थक आणि सीपीएन-यूएमएल कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक आणि हाणामारी झाली. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लावल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
देशभरात काही ठिकाणी जाळपोळी आणि हिंसाचार घडल्याने पोलीस तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यूएमएल नेते थेट काठमांडूला रवाना झाले. नेपाळचे गृह मंत्रालय सांगते की, सेमरातील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे आणि स्थानिक प्रशासन स्थिती स्थिर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे.