समाजवादी पार्टीचे संस्थापक, संरक्षक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासहित देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेते अंत्यदर्शनासाठी सैफईत दाखल होत आहेत. सैफई येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार होईल. यूपी सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक घोषित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतात.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी सैफईत एका शेतकरी कुटुंबात झाला. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रभावित होऊन राजकारणात आलेले मुलायमसिंह १९८९ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
मुलायमसिंग यादव यांची राजकीय कारकीर्द अतिशय गौरवशाली आहे. 1977 मध्ये ते जनता पक्षाकडून पहिल्यांदा यूपीचे मंत्री झाले, तर 1989 मध्ये ते पहिल्यांदा यूपीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1993 आणि त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. मुलायम सिंह यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि 1993 मध्ये बसपासोबत सरकार स्थापन केले. त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पक्षाच्या संरक्षकाची जबाबदारी पार पाडत होते. मुलायमसिंह यादव सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.