(Gallantry Awards) ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान दाखवलेल्या अद्वितीय शौर्याबद्दल भारतीय हवाई दलातील 9 जवानांना ‘वीरचक्र’ प्रदान करण्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली. या कारवाईत हवाई दलाने पाकिस्तानची 6 लढाऊ विमाने पाडली होती. ‘वीरचक्र’ हे युद्धातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक असून ‘परमवीरचक्र’ आणि ‘महावीरचक्र’नंतर त्याचा मान आहे.
सन्मानित वैमानिकांमध्ये ग्रुप कॅप्टन रणजीतसिंग सिद्धू, मनीष अरोरा, अनिमेष पटनी, कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार, सिद्धांत सिंग, रिझवान मलिक आणि फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंह ठाकूर यांचा समावेश आहे. या वैमानिकांनी पाकिस्तानातील मुरिदके व बहावलपूर येथील दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणांवर यशस्वी हल्ले केले.
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 16 जवानांनाही शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान गाजवलेल्या पराक्रमामुळे हा गौरव त्यांना प्राप्त झाला असून, या मोहिमेत बीएसएफचे 2 जवान शहीद झाले होते. बीएसएफने म्हटले आहे की हा सन्मान देशाने त्यांच्या योगदानावर दाखवलेल्या विश्वासाचा प्रतीक आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने या स्वातंत्र्यदिनी एकूण 1,090 जवानांना शौर्य व सेवा पदके जाहीर केली आहेत. यात 233 शौर्यपदके, 99 राष्ट्रपती पोलिस पदके (पीएसएम) आणि 758 मेधावी सेवा पदकांचा (एमएसएम) समावेश आहे. 233 शौर्यपदकांपैकी 152 जवानांना जम्मू-काश्मीरमधील कामगिरीसाठी, 54 जणांना नक्षलवादग्रस्त भागातील मोहिमेसाठी, 3 जणांना ईशान्य भारतातील, तर 24 जणांना इतर भागातील पराक्रमासाठी सन्मानित करण्यात आले. यामध्ये 226 पोलीस, 6 अग्निशामक दलातील आणि होम गार्ड/नागरी संरक्षण विभागातील 1 जवानाचा समावेश आहे.
99 ‘पीएसएम’पैकी 89 पोलीस दलातील, 5 अग्निशामक दलातील, 3 होम गार्ड/नागरी संरक्षण विभागातील आणि 2 करेक्शनल सर्व्हिसेसमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 758 ‘एमएसएम’पैकी 635 पोलीस दलासाठी, 51 अग्निशामक दलातील, 41 होम गार्ड/नागरी संरक्षण विभागातील आणि 31 करेक्शनल सर्व्हिसेससाठी प्रदान करण्यात आले आहेत.