उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल, सत्तेतील जबाबदाऱ्या आणि भविष्यातील दिशा यावरून चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “हा प्रश्न पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, तुम्ही तुमच्या पक्षाचा निर्णय घ्या. आम्हाला यामध्ये कोणतीही अडचण नाही.” राष्ट्रवादीकडून जो काही निर्णय घेतला जात आहे, त्यामागे त्यांची स्वतःची रणनीती असू शकते, असेही महाजन यांनी नमूद केले. “थोडी घाई झालेली दिसतेय, पण त्यामागे काही अडचणी किंवा कारणे असतील,” असे सूचक विधान त्यांनी केले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांवरही गिरीश महाजन यांनी स्पष्ट मत मांडले. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तरी आम्हाला कोणतीही अडचण नाही. उलट त्या एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच होईल. मात्र, हा निर्णय पूर्णपणे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचा आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे भाजपकडून या संभाव्य विलिनीकरणाला विरोध नसल्याचे संकेत त्यांनी दिले.
शरद पवार यांच्या शपथविधीतील भूमिकेबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, “हा अजितदादा पवार यांच्या गटाचा निर्णय आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींबाबत आम्हाला कल्पना नाही.” शरद पवार यांना शपथविधीसाठी आमंत्रण न मिळाल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “जर होण्यासारखे असते तर त्यांना नक्कीच आमंत्रण दिले असते. मात्र सध्या धावपळीचा कार्यक्रम आहे, छोटा शपथविधी आहे.”
महाजन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, हा संपूर्ण विषय राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बाबींचा आहे. “शपथविधीला मी जाणार आहे,” असं सांगत त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. एकीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणं बदलत असताना, भाजप मात्र ‘वॉच अँड वेट’ची भूमिका घेत असल्याचे या वक्तव्यांतून दिसून येत आहे.