बंगळुरूतील केंगरी परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकरणाने पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीची तब्बल 1.53 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या फसवणुकीत आरोपीचा संपूर्ण कुटुंबीयांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार नव्याश्री (नाव बदललेले) हिची ओक्कालिगा मॅट्रिमोनी साइटवरून मार्च 2024 मध्ये विजय राज गौडा उर्फ विजय बी. याच्याशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत विजयने स्वतःला कोट्याधीश व्यावसायिक म्हणून सादर केले. व्हीआरजी एंटरप्रायझेसचा मालक असल्याचे सांगत, बेंगळुरूमधील नामांकित भागांत जमीन, लॉरी, क्रशर आणि मालमत्तांचा दावा केला. एवढेच नव्हे तर ७१५ कोटी रुपयांच्या संपत्तीचे कथित दस्तऐवज दाखवून त्याने विश्वास संपादन केला.
लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तक्रारदाराला आपल्या कुटुंबीयांची ओळख करून दिली. वडील निवृत्त तहसीलदार, आई गृहिणी आणि एक ‘बहिण’ असा सुसंस्कृत परिवार असल्याचे चित्र रंगवण्यात आले. मात्र, हाच परिवार या फसवणुकीचा भाग असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. बँक खात्याची अडचण, न्यायालयीन प्रकरणे, गुंतवणुकीची संधी अशा विविध कारणांवरून आरोपीने फोनपे, बँक ट्रान्सफर आणि रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले. तक्रारदाराबरोबरच तिचे मित्र, नातेवाईक आणि आई-वडील यांनाही या जाळ्यात ओढण्यात आले. दागिने गहाण ठेवूनही पैसे घेतल्याचा आरोप आहे. सगळ्यात धक्कादायक वळण तेव्हा आले, जेव्हा पैसे परत मागण्यासाठी तक्रारदार आरोपीच्या घरी गेली. तिथे तिला समजले की, ‘बहिण’ म्हणून ओळख करून दिलेली महिला प्रत्यक्षात आरोपीची पत्नी आहे, आणि त्यांना एक मुलगाही आहे. आरोपीचे लग्न तीन वर्षांपूर्वीच झाले असल्याचे समोर आले.
पैसे मागितल्यानंतर आरोपी व त्याच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी केंगरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मॅट्रिमोनी साइटवरून सुरू झालेलं नातं, अखेर एका थरारक फसवणूक प्रकरणात कसं बदललं, याचं हे प्रकरण समाजासाठी मोठा इशारा ठरत आहे.