Hike in Gokul milk : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांना सणाच्या निमित्ताने मोठं गिफ्ट देत गाई आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून सणासुदीच्या काळात त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
सध्याचे आणि सुधारित दर:
गोकुळने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार,
म्हशीच्या दूधाचा खरेदी दर: प्रतिलिटर 50.50 रुपयांवरून 51.50 रुपये
गाईच्या दूधाचा खरेदी दर: प्रतिलिटर 32 रुपयांवरून 33 रुपये
ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसे पडावेत, त्यांचे अर्थसंकल्प सुलभ व्हावेत, या उद्देशाने गोकुळने हा निर्णय घेतल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुग्ध व्यवसायात अधिक स्थिरता आणि शाश्वत उत्पन्नाची हमी मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.