२२ जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. या घसरणीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आज, २३ जानेवारी २०२६ रोजी सोनं आणि चांदी पुन्हा एकदा रिकव्हरी मोडमध्ये जाताना दिसत आहेत. अवघ्या एका दिवसात बाजाराने दिशा बदलल्याने गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे.
काल झालेल्या घसरणीनंतर अनेकांना असे वाटू लागले होते की, चांदीचा दर पुन्हा ३ लाख रुपयांच्या खाली येईल. मात्र आज केवळ चांदीच नाही तर सोन्याच्याही किमतींमध्ये मोठी वाढ होत असून, त्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज COMEX वर सोन्याचा दर प्रति औंस 4,964 डॉलर तर चांदीचा दर प्रति औंस 96.506 डॉलर या पातळीवर पोहोचला आहे.
भारतीय बाजाराचा विचार केला तर, गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाले. दिवसाच्या सुरुवातीला किंमतींमध्ये घट झाली होती, मात्र बाजार बंद होईपर्यंत त्या पुन्हा सावरल्या. परिणामी, चांदीचा दर प्रति किलो 3,26,500 रुपये, तर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,56,540 रुपये इतका नोंदवला गेला.
दर पुन्हा का वाढले, यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याचा निर्णय मागे घेतल्याने आणि युरोपीय देशांवर टॅरिफ लावण्यापासून माघार घेतल्याने काल सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली होती. मात्र ही घसरण तात्पुरती ठरली. आता अमेरिकेतील उपभोक्ता खर्च आणि रोजगार बाजारातील मजबूत आकडेवारीचा परिणाम डॉलरवर झाला आहे. डॉलर कमकुवत होत असताना, सोने आणि चांदीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा मोठ्या प्रमाणावर ओढा वाढला आहे.
दरम्यान, ‘रिच डॅड पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीबाबत एक मोठे भाकित केले आहे. २०२६ पर्यंत चांदीचा दर प्रति औंस 200 डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांनी चांदी खरेदीकडे कल वाढवला असून, त्याचाही परिणाम आजच्या वाढत्या दरांवर झाल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.