सोन्याच्या दराने आज इतिहास घडवला आहे! भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदिन नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. आज जीएसटीसह हा दर थेट ₹98,262 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. त्यामुळे ‘सोनं लाखाचं होणार’ही संकल्पना आता वास्तवात उतरण्याची चिन्हं दिसत आहे. सराफ व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांतच सोनं 1 रुपये लाखाच्या वर जाणार असून ग्राहकही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचा दर जीएसटी सह 98,262 रुपये तर जीएसटीविना 95,400 रुपयांपर्यंत पोहोचला. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’नुसार देशभरात 24 कॅरेट सोन्याचा दर 95,207 रुपये इतका आहे. जो आतापर्यंतचा सर्वात उच्च दर आहे. केवळ गेल्या दिवशीच्या तुलनेतच या दरात 628 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्यामुळे अनेक ग्राहक नवीन दागिने खरेदी करण्याऐवजी आधीचे दागिने मोडण्यावर भर देत आहेत. किंमती वाढत असताना सध्याचा ट्रेंड हा 'माग पाहा आणि थांबा' असाच आहे.
सोन्याच्या वाढीमागील तीन मुख्य कारणं, जागतिक टॅरिफ वॉरचा परिणाम , अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार तणावामुळे गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षित आश्रय शोधत आहेत.
रुपयाची कमजोरी
डॉलरच्या तुलनेत रुपया 4% नी घसरल्यामुळे आयात महाग झाली आहे.
लग्नसराईची मागणी
एप्रिल-मे मधील विवाह हंगामामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सोन्याच्या उलट,चांदीच्या दरात थोडीशी घट झाली आहे.1 किलो चांदी 936 रुपयेने स्वस्त होऊन 95,639 रुपयांवर आली आहे. मात्र, मागील महिन्यात चांदी 1,00,934 रुपयांच्या शिखरावर होती. 2025 च्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात तब्बल 19,045 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की, वर्षाअखेरीस आंतरराष्ट्रीय सोन्याचा दर $3,700 प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे भारतात 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 1.10 रुपये लाखांवर जाण्याची दाट शक्यता आहे.