भारत आणि पाकिस्तानचा तणाव जागतिक स्तरावर झाला आहे. आता त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठ दिवसाची परिस्थिती पाहता, सोन्याच्या किमतीत तब्बल 4000 पर्यंतची मोठी घसरण झाली आहे. इतकेच नव्हे, तर मागील 24 तासांतच सोन्याचा दर 2000 नी खाली आला आहे. ज्यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे. आजच्या घडीला 10 ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह 97,541 इतका नोंदवण्यात आला आहे. काही आठवड्यांपूर्वीच ₹1,01,500 च्या आसपास असलेला दर आता 1 लाखाच्या खाली येऊन थांबला आहे. या घटनेमुळे अनेक गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले असून, ग्राहक मात्र आनंदीत झाले आहेत.
सोन्याच्या दरात झालेल्या घटेमुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील सराफा दुकाने ग्राहकांनी फुलून गेली आहेत. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना ही सुवर्णसंधी असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. पुढील काही दिवसांत सोन्याचा दर आणखी खाली येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, भारत-पाकिस्तान तणावासोबतच अमेरिकेतील व्याजदर धोरण, तेलाच्या किंमतीतील चढउतार तर डॉलर-रुपया दरातील बदल दिसत आहेत. यामुळेही जागतिक बाजारात गुंतवणूकदारांनी सोन्यापासून माघार घेतल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजेच भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांसाठी संधी की धोका?
सध्याच्या घसरणीचा वापर करून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करू शकतात, असं काही विश्लेषकांचे म्हणणं आहे. मात्र बाजाराचा पुढील प्रवास अनिश्चित असल्याने योग्य सल्ल्यानेच निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.