भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली आहे. १९ डिसेंबरला २४ कॅरेट सोन्याचा दर ३६० रुपयांनी घसरून १,३४,१२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याचा दर ३३० रुपयांनी कमी होऊन १,२२,९४३ रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याच्या दरात होणारी बदल ही आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्ड रेट, डॉलरच्या विनिमय दरातील बदल आणि सोन्यावर असलेले आयात शुल्क यावर अवलंबून असते. अमेरिकेत महागाई कमी होण्याच्या आकडेवारीसंदर्भातील अपेक्षा आणि डॉलरच्या मजबुतीमुळे मागणी कमी होत असल्यानं सोन्याचे दर उच्चांकावरून खाली आले आहेत.
भारतामध्ये सोन्याचे दर दुबईच्या तुलनेत जास्त आहेत. १९ डिसेंबरला भारतातील २४ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर १,३४,१२० रुपये, तर दुबईमध्ये तो १,१२,८१६ रुपये होता. म्हणजेच भारतात दुबईच्या तुलनेत सोनं २१,३०४ रुपयांनी महाग मिळत आहे. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही भारतात दुबईपेक्षा अधिक आहेत.
सोन्याचे दर वर्षभरात ५६,६५४ रुपयांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही १,१४,३१९ रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीचा जीएसटीशिवाय दर २,०१,१२० रुपये, तर जीएसटीसह २,०६,३४६ रुपये प्रति किलो आहे. चांदीचे दर औद्योगिक मागणीमुळे वाढले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, नवीकरणीय उर्जा, आणि सौर ऊर्जा पॅनेल तयार करण्यासाठी चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय.