Gold Rate : अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूक धोरणकार एड यार्डेनी यांनी सोन्याच्या किमतींबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, चालू दशक संपेपर्यंत सोन्याच्या दरात मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. 2029 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव थेट 10,000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.
सध्या जागतिक बाजारात सोन्याचा दर सुमारे 4,400 डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे. जर पुढील काही वर्षांत दर 10,000 डॉलरपर्यंत पोहोचले, तर ही वाढ सुमारे 125 टक्क्यांहून अधिक असेल. म्हणजेच सोन्याची किंमत जवळपास अडीच पट वाढू शकते.
भारतीय बाजाराचा विचार केला, तर सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव सुमारे 1,35,000 रुपयांच्या आसपास आहे. जर आंतरराष्ट्रीय दराप्रमाणेच वाढ झाली, तर 2029 पर्यंत देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर 3 लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. न्यूयॉर्कमधील कॉमेक्स एक्सचेंजवर अलीकडेच सोन्याने उच्चांक गाठला होता.
आजचे सोने-चांदीचे दर
सराफा बाजारात सध्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. चांदीच्या दरात 7 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असून, सोन्याच्या किमतीतही जवळपास 1800 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर सुमारे 2.13 लाख रुपयांवर पोहोचला आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह सुमारे 1.37 लाख रुपये प्रति तोळा झाला आहे. चालू वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, चांदीच्या दरातही विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. 22 कॅरेट सोन्याचाही भाव वाढून तो 1.22 लाख रुपयांच्या पुढे गेला असून, करासह त्याची किंमत सुमारे 1.26 लाख रुपये झाली आहे.