गेल्या सहा महिन्यांचा विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांचा आलेख पाहता सोन्याच्या दरामध्ये तेजीच पाहायला मिळालेली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा झाला असून याउलट सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागले आहेत. इतकेच नव्हे तर सोन्याबरोबर सहा महिन्यांमध्ये चांदीचाही भाव वधारताना दिसला.
सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. जसे जागतिक स्तरावरची आर्थिक अस्थिरता, चलनवाढ, आणि गुंतवणूकदारांचा सोन्याकडे असलेला वाढता कल यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. गुरुवारी सोन्याचा दर 961 रुपयांनी वाढला असून सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 97046 रुपये प्रति एक तोळा तर 22 कॅरेट सोन्याचा दर 88894 रुपये इतका आहे.
तसेच चांदीचेही दर 654 रुपयांनी वाढले असून चांदीचा दर 107934 रुपये इतका आहे. गेल्या सहा महिन्यांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की , सोन्याच्या दरात गेल्या सहा महिन्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊन सोन्याचे दर तब्बल 27 टक्क्यांनी वाढले. आहेत. याचा सर्वात जास्त फायदा सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना झाला असून त्यांना लॉटरीच लागल्याचे चित्र सध्या आहे. तस पाहता सध्या सोन्याला एक मजबूत गुंतवणूक मानतात. त्यामुळे सोन्याच्या दरातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या खिशाला सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे.
याउलट सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला गेल्या सहा महिन्यांमध्ये मोठी कात्री लागली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागले आहेत. सुरवातीला रुपयाची किंमत कमी झालेली पाहायला मिळत होती. मात्र येत्या काळात रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही तज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही महिन्यांत सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, तर काही जण दर कमी होण्याची शक्यता वर्तवत आहेत. मात्र आता जर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबावं लागणार आहे कारण सध्या तरी सोन्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार दर कमी होण्याची वाट पाहत आहेत.