थोडक्यात
सोन्यातील दरवाढीचे वादळ शमले आहे
सोने एक लाखांच्या आत येणार का?
जागतिक बाजारात सोने 6 टक्क्यांनी घसरले आहे
दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्याचे दर लक्ष्मीपूजनानंतरच्या चार दिवसांत तोळ्यामागे 8 हजार रुपयांनी घसरले; तर चांदीच्या दरात किलोमागे 38 हजार रुपयांची घट झाली. नरकचतुर्दशीला सोने एक लाख 31 हजार रुपये प्रति तोळे दराने विकले गेले; तर चांदीचा किलोमागे दर एक लाख 91 हजार रुपये होता. दिवाळीनंतर चार दिवसांत म्हणजे शनिवारी सोने प्रति तोळे एक लाख 23 हजार रुपये तोळे, तर चांदी एक लाख 53 हजार रुपये किलोपर्यंत घसरली. गेल्या आठ दिवसांत राज्यात 1700 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी करण्यात आली. त्यात मुंबईचा वाटा 1100 कोटींचा होता. मुंबई, नाशिक, जळगाव, पुण्यासह राज्यात अंदाजे 460 टन तर एकट्या मुंबईत सर्वाधिक 320 टन सोन्याची विक्री झाली.
सोने सणासुदीत गगनाला भिडले. किंमती आता दीड लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. पण दिवाळी पाडवा येताच सोन्यात पडझडीला सुरुवात झाली. त्यासाठी अनेक कारणे समोर आलीत. Profit Booking मुळे अनेकांना सोने स्वस्त असतानाच अनेकांनी ते खरेदी केले आणि किंमती गगनाला भिडताच ते विक्रीसाठी बाजारात आणले. त्याचा परिणाम थेट किंमतींवर झाला. सोन्याची बाजारातील आवाक वाढताच भाव घसरले. सोन्याचा तोरा उतरण्याचे दुसरे कारण म्हणजे डॉलर मजबूत झाला.
जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर घसरत होता. पण जेव्हा डॉलर मजबूत झाला. तेव्हा इतर देशांनी डॉलर मजबूत होताच सोन्याची खरेदी कमी केली. गुंतवणूकदारांनी सोन्याकडून डॉलरकडे मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्याची किंमत अजून घसरली. सोने घसरणीचे तिसरे कारण म्हणजे मागणी घसरली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(IBJA), धनत्रयोदिशी आणि दिवाळीच्या दिवशी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. आता बाजारात मोठी गर्दी नाही. सणासुदीला मागणी घटल्याने किंमती दबावाखाली आल्या आणि सोने स्वस्त झाले.
सोने 1 लाखांपेक्षा स्वस्त होणार?
सोन्यातील ही घसरण अशीच कायम राहणार का, असा सवाल करण्यात येत आहे. अनेकांना सोने 1 लाखांच्या खाली उतरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, हे एक टेक्निकल करेक्शन आहे. जेव्हा एखादी वस्तू महाग होते. तेव्हा त्यात थोडी घसरण येणे ही बाब स्वाभाविक आहे. बाजाराला एका दरापर्यंत स्थिर करण्याचा हा प्रयत्न असतो.
तज्ज्ञांच्या मते सोने एकदम खाली येण्याची शक्यता कमीच आहे. सध्या सोन्याचा भाव कमी आहे. तोपर्यंत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. पण येणारा काळ हा लग्न सोहळ्यांचा आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. कारण या काळात सोन्याला मोठी मागणी असते. त्यामुळे सोने जोपर्यंत गडगडत नाही तोपर्यंत ते एक लाखांच्या खाली उतरेल असे सांगता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.