थोडक्यात
सोने आणि चांदीचे दर गगनाला
चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ
10 ग्रॅम सोने GSTसह 1 लाख 23 हजार 800 रुपयांवर
(Gold Silver Price) देशातील सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीच्या दरांनी झेप घेतली असून दोन्हींचे भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता, रशिया-युक्रेन युद्ध आणि इतर काही कारणांमुळे सोन्या-चांदीमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही होत आहे.
गेल्या वर्षभरात चांदीच्या दरात तब्बल 70 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात चांदीचे दर 7 ऑक्टोबर 2024 रोजी 88 हजार रुपये प्रति किलो, 1 जानेवारी 2025 रोजी 99 हजार 500 रुपये, 1 मार्च रोजी 1 लाख 1 हजार रुपये, 1 जून रोजी 1 लाख 10 हजार रुपये आणि 1 सप्टेंबर रोजी 1 लाख 40 हजार रुपये प्रति किलो इतके होते. या तुलनेत आजचा दर विक्रमी उंचीवर पोहोचला आहे.
चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातदेखील मोठी झेप पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात पुन्हा एकदा 1,500 रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह 1 लाख 23 हजार 800 रुपये इतका झाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-गाझा संघर्ष, अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदरात झालेली कपात आणि अमेरिकेतील शटडाऊन या सर्वांचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेसाठी सोन्या-चांदीकडे वळण्याचा कल वाढला आहे.
दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना या वाढलेल्या दरामुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. सोनं आणि चांदी खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.