मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन सेवा वापरणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकासाचे काम सुरू आहे. यामध्ये नवीन टर्मिनल्सचा विस्तार, अतिरिक्त प्लॅटफॉर्मची उभारणी, नवीन पिट लाईन्स, होल्डिंग आणि स्टेबलिंग लाईन्स, शंटिंग सिस्टीममध्ये सुधारणा तसेच मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभाल सुविधांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून लवकरच वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेकडून कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बोरिवली ते चर्चगेट दरम्यान लोकल सेवांची संख्या तब्बल २२ ने वाढवण्यात येणार आहे. यामुळे गर्दी कमी होऊन प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार आहे. ही सुधारित सेवा जानेवारी महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा असून त्यानुसार नवीन वेळापत्रकही लवकरच लागू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची प्रवासी अनेक वर्षांपासून वाट पाहत होते.
पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय कमीत कमी व्हावी यासाठी काम अत्यंत अचूक पद्धतीने केले जात आहे. उपनगरीय रेल्वे नेटवर्कची प्रवासी क्षमता वाढवणे हे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले उद्दिष्ट असून, या प्रकल्पामुळे ते मोठ्या प्रमाणात साध्य होणार आहे.
मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकते. हे काम १८ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर लाईनची फिटनेस तपासणी व इतर तांत्रिक प्रक्रिया पार पाडल्या जातील. सर्व बाबी सुरळीत झाल्यास फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अतिरिक्त लोकल सेवा सुरू होतील. सहाव्या मार्गामुळे वांद्रे टर्मिनस ते बोरिवलीदरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरीय लोकल वेगळ्या मार्गावर धावू शकतील. यामुळे गाड्यांची वेळेवरता सुधारेल, सुरक्षितता वाढेल आणि विद्यमान ट्रॅकवरील ताण कमी होईल.
दरम्यान, या कामामुळे काही दिवस प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रविवारी कांदिवली-बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे सुमारे २३५ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. परिणामी प्रमुख स्थानकांवर मोठी गर्दी झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ बंद असल्याने उर्वरित प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त ताण आला. विरार ते चर्चगेट प्रवास अधिक त्रासदायक ठरला, गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
शाळांच्या सुट्ट्या आणि पर्यटनासाठी वाढलेली गर्दी यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. मात्र, हे तात्पुरते त्रास असून भविष्यातील सुधारित आणि अधिक सक्षम लोकल सेवेसाठी हे काम अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.