थोडक्यात
वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
मुंबईहून गोव्याला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता दररोज धावणार
कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार
भारतीय रेल्वेने कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे. मुंबई आणि गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे. वाढत्या प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, रेल्वेने या गाडीच्या फेऱ्याच नाही तर डब्यांची संख्याही वाढवली आहे.
देशातील सर्वात वेगवान आणि आधुनिक गाड्यांपैकी एक असलेली मुंबई सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता आठवड्यातून सहा दिवस धावेल. पूर्वी, पावसाळ्याच्या वेळापत्रकामुळे जून ते ऑक्टोबर दरम्यान आठवड्यातून फक्त तीन दिवस धावत होती. मात्र आता २२ ऑक्टोबरपासून, ती नियमितपणे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांवर थांबेल आणि त्याच दिवशी मडगाव स्टेशन (गोवा) येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सकाळी ५:२५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. शुक्रवारी एक्स्प्रेस धावणार नाही.
परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक २२२३० मडगाव जंक्शन-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दुपारी २:४० वाजता मडगाव जंक्शन येथून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०:२५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. शुक्रवारी एक्स्प्रेस धावणार नाही.
पावसाळ्यात, मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला तेच अंतर कापण्यासाठी १० तासांपेक्षा जास्त वेळ लागत असे.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या प्रवाशांच्या वाहतुकीला सामावून घेण्यासाठी, या ट्रेनमध्ये १६ कोच जोडले जातील, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर होईल. या निर्णयामुळे मुंबई, कोकण आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
1 नोव्हेंबरपासून गैर पावसाळी वेळापत्रक
पावसाळा थांबल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नियोजनानुसार, कोकण रेल्वेवर नियोजनानुसार म्हणजेच १ नोव्हेंबरपासून गैर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादाचा फायदा होत आहे. सध्या ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावते. १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू झाल्यामुळे, वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल. दिवाळीच्या सुट्टीसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.
दरम्यान, भारतीय रेल्वेवरील प्रतिष्ठित हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम मध्य-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेससह एकूण ४४ मार्गांवरील ८८ रेल्वे गाड्यांचा वेग वाढवला जाईल. यात प्रवासी पसंतीच्या जनशताब्दी, तेजस, दुरांतो, मत्स्यगंधा, हमसफर, मांडवी, मरूसागर, कोकणकन्या, तुतारी, गोवा संपर्क क्रांती यांचा समावेश आहे. पावसाळ्यात, कोकण रेल्वे विभागाची वेग मर्यादा ७५ किमी/तास आहे. यामुळे पावसाळी वेळापत्रकात कोकण रेल्वेवरील विभागात ताशी ७५ किमी अशी वेगमर्यादा असते. गैर पावसाळी वेळापत्रकात अशी ठराविक वेगमर्यादा नसते. यामुळे कमाल वेगाच्या नियमानुसार मेल-एक्स्प्रेस धावतात. मुंबई-गोवा मार्गावर काही भागांसाठी रेल्वेगाड्यांना १०० ते १२० ताशी किमी या वेगाची मंजुरी आहे.