अल्पवयीन मुलांवर घातक परिणाम करणाऱ्या काही चुकीच्या औषधांच्या घटनांनंतर केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी महाराष्ट्रात तातडीने सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री यांनी दिली.
ते म्हणाले, “राज्यातील एफडीए आणि आरोग्य यंत्रणा पूर्ण सतर्कतेने काम करत आहेत. केंद्र शासनाकडून काही औषध उत्पादक कंपन्यांविषयी स्पष्ट सूचना आल्या असून त्या सूचनांनुसार तातडीने कारवाई केली जात आहे. एखाद्या कंपनीकडून चूक झाली म्हणून सर्वांवर संशय घेणे योग्य नाही, पण दोषी ठरलेल्या कंपन्यांवर कठोर पावले उचलली जातील.”
मध्यप्रदेशातील सीमाभागात तयार झालेल्या औषधांमुळे धोका वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातही विशेष दक्षता घेतली गेली आहे. “राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. एफडीए, डीएमआर आणि आरोग्य विभाग एकत्रितपणे याची अंमलबजावणी करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, “या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने तयारी करत आहेत, हे स्वाभाविक आहे.”
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीवर भाष्य करताना त्यांनी नागरिकांच्या मदतीच्या भावनेचे कौतुक केले. “काही ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. अशा प्रकरणांवर मी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीन,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मराठवाड्यासह अनेक भागात नागरिक पूरग्रस्तांसाठी मदत देत आहेत. काल सरोवड्यात एका निवृत्त शिक्षकाने स्वतःहून 21 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. समाजातील ही संवेदनशील भावना कायम राहावी, हेच महत्त्वाचे आहे.”