थोडक्यात
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.
नव्या राज्यपालांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं
Maharashtra New Governor : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) कडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी त्या निवडणुकीत यश मिळवलं आहे. उपराष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी राज्यपालपद सोडलं असून, त्यानंतर महाराष्ट्राच्या नवे राज्यपाल कोण असणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.
या चर्चांना पूर्णविराम देत, अखेर नव्या राज्यपालांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. गुजरातचे सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नव्या प्रशासकीय पर्वाची सुरुवात होणार आहे.
आचार्य देवव्रत हे शिक्षणक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी याआधी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही कार्य केलं आहे. २०१५ ते २०१९ या कालावधीत त्यांनी हिमाचल प्रदेशात राज्यपालपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. त्यानंतर त्यांची गुजरात राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.
आता त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या कारभारावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.