Piyush Goyal On GST : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी नव्या जीएसटी सुधारणांचे स्वागत करताना त्यांना ‘गेम चेंजर’ असे संबोधले आहे. त्यांनी म्हटले की या सुधारणांचा थेट लाभ देशातील प्रत्येक ग्राहकाला होणार असून उद्योग क्षेत्राने तो पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवावा.
गोयल इंडिया मेडटेक एक्स्पो 2025 या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत राबवलेल्या विविध करसुधारणांच्या पार्श्वभूमीवर ही जीएसटी सुधारणा अत्यंत महत्त्वाची ठरते. औषधनिर्मिती क्षेत्र, शेतकरी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) यांसह अनेक क्षेत्रांवर याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यांनी स्पष्ट केले की देशातील प्रत्येक हितधारक व प्रत्येक ग्राहकाला या सुधारणांमुळे दिलासा मिळणार आहे. विशेषत: औषधनिर्मिती आणि न्यूट्रास्युटिकल उद्योगांना यामुळे नवे प्रोत्साहन मिळेल.
गोयल यांनी पुढे म्हटले की, या सुधारणा केवळ अल्पकालीन फायद्यापुरत्या मर्यादित नसून भारताच्या विकसित देश होण्याच्या 2047 च्या प्रवासात त्यांची निर्णायक भूमिका असेल. उद्योग क्षेत्राने या लाभाचा संपूर्ण परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले.