Gulabrao Patil On Eknath Shinde : प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचा त्यांना अंदाज आला असेल. त्यामुळेच पुढील काळात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे त्यांना वाटत असावे.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी असेही म्हटले की, जर प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळाला, तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
राजकीय चर्चांना उधाण
सध्या मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत अशा प्रकारची वक्तव्ये वेगवेगळ्या अर्थाने घेतली जात आहेत.
याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही लवकरच देशाला मराठी पंतप्रधान मिळेल, असे भाकीत केले होते. त्यामुळेदेखील राजकीय चर्चांना चालना मिळाली आहे. शिवाय उद्धव ठाकरे गटातील काही आमदार पक्ष सोडण्याच्या चर्चाही सुरू आहेत. या सर्व दावे, अंदाज आणि राजकीय घडामोडींचा शेवट नेमका कुठे होणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.