शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोजिलेल्या मेळाव्यात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंचावरून जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू संजय राऊत होते. ‘शिवसेना संपवणारा जर कोणी असेल, तर तो एकटाच, संजय राऊत’, असा थेट आरोप करत त्यांनी राऊत यांच्यावर जहरी टीका केली.
भाषणाच्या सुरुवातीलाच गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांबाबत त्यांच्या वैयक्तिक अनुभवांची आठवण करून दिली. “खरं सांगायचं झालं तर माझं जे ‘प्युअर माल’, आहे ते संजय राऊत. आमच्या ताईंनी त्याच्याबाबत एकदा बोलूनही दाखवलं होतं. मी आज अभिमानाने सांगतो की, ज्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा हेच संजय राऊत नावाचं कार्टून म्हणालं होतं, ‘हा काय संपलेला पक्ष, याच्यासोबत काय युती करायची?’ आणि आता तेच मनसेला म्हणतात, आय लव यू. भावाने भावापाशी आलं पाहिजे, असं ते म्हणतात.”
“संजय राऊत यांना आता वास्तव कळू लागलंय”
गुलाबराव पाटील यांनी सूचकपणे म्हटलं की, संजय राऊत यांना आता वास्तव समजू लागलं आहे. “आज त्यांच्या लक्षात आलंय की ज्या प्रकारे विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकवला. त्याच पद्धतीने महानगरपालिकांवरही महायुतीचा भगवा झेंडा फडकवला जाईल,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.
अयोध्या भेटीचा किस्सा उघड
गुलाबराव पाटील यांनी अयोध्या भेटीच्या वेळी घडलेली गोष्ट उघड करत संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेंशी असलेल्या संबंधांचा पर्दाफाश केला. “संजय राऊत स्वतः म्हणतात की, ते अयोध्येला शिंदे साहेबांसोबत गेले होते. त्यांनी सांगितलं की अयोध्येला गेल्यावर शिंदेसाहेबांनी त्यांना एका खोलीत सांगितलं की, आपण दोघं मिळून संपूर्ण गट घेऊन बाहेर पडूया. मग आज काय झालं? तेच राऊत आज म्हणतात आम्ही गद्दार, आम्ही चिन्ह चोरलं, धनुष्यबाण चोरला.”
“तुझं लाडकं पोरगं बडगुजर कुठं गेलं?”
पुढे संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर हल्ला चढवत गुलाबराव म्हणाले, “तुझ्याबरोबर राहणारा बडगुजर कुठं गेलाय रे राऊतसाहेब?, तुझं तर लाडकं पोरगं होतं ना ते? आम्ही जरी सत्तेसाठी गेलो, गद्दारी केली असं तुम्ही म्हणत असला, तरी तुझ्या आजूबाजूची माणसंही तुला सोडून जातायत. हेच पुरेसं आहे.”
“राऊतसाहेब शिवसेना संपवणारे एकमेव महामंडलेश्वर”
गुलाबराव पाटील यांचं सर्वात धारदार वाक्य म्हणजे, “मुळात शिवसेना संपवणारा जर कोणी महामंडलेश्वर असेल, तर तो संजय राऊत आहे.” हे विधान करत त्यांनी राऊत यांना शिवसेनेच्या आजच्या स्थितीसाठी थेट जबाबदार धरलं. ते पुढे म्हणाले, “राऊतसाहेब जळगावला येऊन आमच्यावर भुंकतात. ते म्हणाले आम्ही पाच फुटलो. पण आम्ही तर शिवसेनेसोबतच होतो. त्यांनी आम्हाला धमकावलं. पण आम्ही पाचही आमदार पुन्हा निवडून आलो. याला स्वतःच्या मतांवर निवडून येण्यासाठी माणसं मिळाली नाहीत. आमच्या मतांवर खासदार झालं. साधं नगरसेवकही होऊ शकलेलं नाही आणि आज टीका करतायत शिंदे साहेबांवर.”
हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठी अस्मिता
गुलाबराव पाटील यांनी भाषणाच्या शेवटी हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाम भूमिका घेतली. “आज हे लोक मराठी अस्मितेचा नारा देतात. पण हिंदुत्व सोडलंय. बाळासाहेबांची शिवसेना जर कोणी जपली असेल, तर ती एकनाथ शिंदेंनी,” असं ते म्हणाले. संपूर्ण भाषणाचा शेवट त्यांनी अतिशय आक्रमक विधानाने केला, “संजय राऊतांचा सत्यानाश होवो!” या वाक्याने त्यांनी आपलं भाषण संपवलं.
हेही वाचा