महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क येथील पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली असून पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना कायदा कळतो की, नाही असा प्रश्र उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण न वाचता, त्यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला हा एक घाट आहे, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
हिंदी भाषेचा कायदा म्हणजे शासन निर्णय राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं आहे. ही कृती अत्यंत चुकीची आहे. म्हणून राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे. तर स्वतःच्या फायद्यासाठी राज ठाकरेंनी भाषिक वाद घालण्याचा घाट घातला आहे. हे विदारक आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर देखील कोणी एवढं तालिबानी पद्धतीनं वागलं नसेल, असं राज ठाकरे वागतायंत, असं म्हणत जिव्हारी लागणारी टीका सदावर्तेंनी केली. यावेळी टोलच्या मुद्यावरून देखील राज ठाकरेंना त्यांनी डिवचलं.