घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्यांच्या त्या वक्तव्यावरून विधानसभेत पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला आहे, त्याचसोबत भैय्याजी जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. याचपार्श्वभूमिवर गुणरत्न सदावर्ते भैय्याजी जोशींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी भैय्याजी जोशींचे समर्थन करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली पातळी राखली पाहिजे, असं म्हटले आहे.
उद्धव आणि राज ठाकरेंनी आपली पातळी राखली पाहिजे - गुणरत्न सदावर्ते
तसेच पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "जे टीकाकार टीका करत आहेत त्यांनी दुसऱ्याला भाषेचे ज्ञान पाजळायचे प्रयत्न करू नये. उद्धवच्या बाबतीत ठीक आहे, ते कलाकार आहेत त्यामुळे कलाकारांची एक वेगळी रिस्पेक्ट असू शकते. पण, उद्धव आणि राज ठाकरेंनी आपली पातळी राखली पाहिजे. राजकारणासाठी भाषेची चूल मांडणारे हे लोक आहेत. भाषा हे संवाद साधण्याचे आणि समजण्याचे माध्यम आहे".
"मुंबईत हायकोर्ट आहे आणि त्याचे काम इंग्रजीत होते. मराठी वगळता दुसरी भाषा बोलता येणार नाही असे प्रतिबंध कुठेच नाही. दुसऱ्यावर बोलताना स्वतःकडे बघून बोलावे. स्वतःच्या औलादी इंग्रजीत शिकवयाच्या आणि दुसऱ्याना ज्ञान पाजायचे हे नाही चालत. महाराष्ट्रातही मराठी भाषेत फरक आहेत, विदर्भात हिंदी भाषेत संवाद साधला जातो". असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.