(Harbour Line ) हार्बर आणि ट्रान्स मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती मिळत आहे. नेरुळ ते पनवेल सेवा बंद आहेत. नेरूळ - सीवूड्स रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक वरून मशीनचे चाक खाली उतरल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे बंद असल्याची माहिती मिळत आहे.
नेरुळ ते पनवेल मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. नेरुळजवळ तांत्रिक बिघाडामुळे लाईन बंद झाली असून वाशी ते बेलापूर दरम्यान सेवा विस्कळीत झाली आहे. वाशी ते सीएसएमटी सेवा सुरू, आहे मात्र वाशी ते सीएसएमटी लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने नवी मुंबईत आणि ठाण्यात कामासाठी प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले आहेत. लोकल उशिरा असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या तीन तासांपासून हे काम सुरू असून अजूनही काही तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.