महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम यांची नावं या कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेत होती. मात्र या बड्या नेत्यांना मागे टाकत त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे.
दरम्यान आता या प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "एक सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो हे या नियुक्तीने सिद्ध केले आहे. कोणत्याही वाड-वडिलांचा, राजकीय वारसा नसताना मला ही संधी मिळाली आहे. ही खुप मोठी संधी आहे आणि या संधीचं मी सोनं करणार आहे".
पुढे ते म्हणाले की, "अनेक बड्या नेत्यांची नावं होती. यापैकी कोणीही प्रदेशाध्यक्ष झालं असतं तरीही निश्चितपणे चांगलं काम केलं असतं. पण दिग्गजांचे मार्गदर्शन घेऊन मी माझी पुढील वाटचाल करणार आहे".
सध्या जे सरकार आहे त्याविरोधात आमची राजकीय भूमिका बघायला मिळेल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची कामं प्रामुख्याने केली जातील. सध्या महाराष्ट्रात जातीवादाचे थैमान असलेले बघायला मिळत आहे. त्यामुळे सद्भावनेची गरज महाराष्ट्राला आहे. जातीवाद संपवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत.