थोडक्यात
39 आमदारांनी शपथ घेतली, ज्यात भाजपचे 19, शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाचे 9 आमदारांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे, विशेषतः छगन भुजबळ यांची नाराजी चर्चा केली जात आहे.
हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली, पण अधिक तपशील दिला नाही.
राज्यात रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे 19 शिवसेना शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार गटाच्या 9 आमदारांनी शपथ घेतली. या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. यावरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सगळे त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. आमच्या वरिष्ठांनी त्यांच्याबद्दल काय करायचं हे ठरवलं असेल असं मला वाटतं.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.