मराठी रंगभूमीवरील मानाचा आणि प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना दिला जाणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने हा सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कारात शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख 25 हजार रुपयांचा समावेश आहे. हे पदक यंदा 58 व्या वर्षी दिले जाणार आहे.
नीना कुळकर्णी या मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील एक मान्यवर नाव आहे. अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. 1970 च्या दशकात मॉडेलिंगपासून सुरुवात झालेला त्यांचा कलात्मक प्रवास आज चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. गुंतता हृदय हे या नाटकापासून सुरू झालेला त्यांचा रंगभूमीवरील प्रवास पुढे हमीदाबाईची कोठी, महासागर, ध्येयनी मनी अशा नाटकांतून बहरला.
मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी वेगळ्या आणि प्रभावी भूमिका केल्या आहेत. सवत माझी मुलगी, आई, शेवरी, फोटोप्रेम या चित्रपटांतील कामगिरीसाठी त्यांना राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाले. हिंदी चित्रपटांत नायक, गुरु, पहेली, भूतनाथ यांसारख्या चित्रपटांत त्यांचे अभिनय गाजले.
दूरदर्शन आणि OTT प्लॅटफॉर्मवरही त्यांचे योगदान मोठे आहे. ये है मोहब्बतें या मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली, तर Breathe, Unpaused, The Good Karma Hospital या आंतरराष्ट्रीय मालिकांमध्येही त्यांचे काम गाजले. त्यांच्या समृद्ध आणि बहुआयामी योगदानाचा गौरव करण्यासाठी यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक त्यांना जाहीर झाल्याने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे.