बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सहावी सुनावणी आज, मंगळवारी (3 जून रोजी) बीड येथील विशेष न्यायालयात पार पडली. खटल्याच्या तपशीलावर आणि आरोपी वाल्मिक कराडच्या बाजूने दाखल केलेल्या अर्जांवर 17 जून रोजी निर्णायक सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनी माध्यमांसमोर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
देशमुख कुटुंबियांचा ठाम निर्धार.. “न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार”
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की, "आरोपीचे वकील वारंवार निर्दोष मुक्तीचे अर्ज दाखल करत आहेत. मात्र, आम्ही शेवटपर्यंत न्यायाच्या भूमिकेत ठाम आहोत. आमचे संपूर्ण कुटुंब आणि गाव न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. नियती कुणालाही माफ करत नाही. ज्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे, त्यांना शिक्षा होणारच आहे."
ते पुढे म्हणाले की, "सरकारी वकील उज्ज्वल निकम संपूर्ण प्रकरणावर वस्तुनिष्ठ भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आम्ही फारसे बोलत नाही. आम्ही केवळ न्यायप्राप्तीसाठी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संयम बाळगून आहोत."
जप्ती आदेशावर पुढील सुनावणी 17 जूनला
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, "आरोपी वाल्मिक कराडच्या विरोधात सरकारने स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचा आदेश दिला होता. यावर कराडच्या वकिलांकडून उत्तर देण्यात आले असून, त्या अर्जावरही 17 जून रोजी सुनावणी होईल. सरकारच्या वतीने अॅड. कोल्हे युक्तिवाद सादर करतील."
याच दिवशी कराडला मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) मधून दोषमुक्त करायचे की त्याच्यावर आरोप निश्चित करायचे, यावर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. न्यायालयात सरकारने प्रस्ताव ठेवला की दोन्ही मुद्द्यांवर एकत्रित सुनावणी होऊन निर्णय घ्यावा. मात्र, बचाव पक्षाने प्रथम मकोका काढण्याची मागणी करत एकत्रित निर्णयास हरकत नोंदवली आहे.