थोडक्यात
हृदयरोगाचे संकेत वेळीच ओळखा
हार्ट अटॅकपूर्वी शरीर देतं हे संकेत
हार्ट अटॅक अचानक का येत नाही?
आजच्या काळात असा क्वचितच कुणी असेल ज्याने आपल्या नात्यातल्या किंवा परिचयातील एखाद्या व्यक्तीच्या हार्ट अटॅकने मृत्यूची बातमी ऐकली नसेल. कधी विचार केलात का, आजकाल इतक्या कमी वयात लोकांना हार्ट अटॅक का येतो? फिट, हेल्दी दिसणारे लोकही क्षणार्धात कोसळतात आणि आपल्याला नवल वाटतं की “अरे, त्याला तर काहीच त्रास नव्हता!” आज अनेक तरुणवयीन लोकांनाही हार्ट अटॅक येतो आणि काहीजण आपला जीव गमावतात. पण खरंय की कधीच अचानक हार्ट अटॅक येत नाही. (Health News)
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सुमारे 1.79 कोटी लोक दरवर्षी हार्ट अटॅकने मृत्यूमुखी पडतात. अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक अचानक येतो आणि त्याची कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. पण हे खरं नाही! संशोधन सांगतं की, बहुतांश हृदयरोग हळूहळू वाढत जातात आणि त्यांची चिन्हं आधीच शरीरात दिसू लागतात.
हृदयरोगाचे संकेत वेळीच ओळखा
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आलेल्या 99% लोकांमध्ये काही वर्षांपूर्वीच लक्षणं दिसत होती. त्यात उच्च रक्तदाब, साखरेचं प्रमाण वाढणं, कोलेस्ट्रॉल जास्त असणं किंवा धूम्रपानाची सवय ही मुख्य धोक्याची चिन्हं होती. डॉक्टर सांगतात की, या छोट्या पण महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढतो.
हार्ट अटॅकपूर्वी शरीर देतं हे संकेत:
- सतत थकवा जाणवणे किंवा उर्जेचा अभाव
- छोटं काम केल्यावरही श्वास लागणे
- छातीत फडफड किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणे
- वारंवार छातीत जळजळ, अपचन
- उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल
- चालताना पायात गोळे येणे किंवा वेदना
- जबडा, हात किंवा छातीत घट्टपणा
- अचानक घाम येणे किंवा चिंताग्रस्त वाटणे
हार्ट अटॅक अचानक का येत नाही?
90 लाखांहून अधिक दक्षिण कोरियन आणि हजारो अमेरिकन लोकांवरसंशोधकांनी 20 वर्षांचा अभ्यास केला. निष्कर्ष असाच निघाला, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात एक तरी संकेत आधी दिसतोच. अगदी रक्तदाब थोडा वाढला, साखर किंचित जास्त झाली किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं तरीही ते हृदयरोगाचा संकेत मिळू शकतो. अमेरिकेतील डॉ. फिलिप ग्रीनलँड सांगतात, “ब्लड प्रेशर, शुगर किंवा कोलेस्ट्रॉल जरा जरी वाढलं तरी दुर्लक्ष करू नका. वेळेवर टेस्ट आणि उपचार केल्यास धोका कमी होतो.”
हार्ट अटॅकची मुख्य कारणं
हार्ट अटॅक एका कारणामुळे होत नाही. धूम्रपान, व्यायामाचा अभाव, जास्त तेलकट किंवा गोड पदार्थ, ताण-तणाव, अपुरी झोप आणि हाय ब्लड प्रेशर ही मुख्य कारणं आहेत. यापैकी एक-दोन सवयींचाही हृदयावर विपरीत परिणाम होतो आणि अर्टरीज ब्लॉक होऊ लागतात.
हार्ट अटॅकपासून बचाव कसा कराल?
या संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की हार्ट अटॅक अचानक नाही येत, तो वर्षानुवर्षांच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम असतो. म्हणूनच—
- नियमित आरोग्य तपासणी करा
- ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल तपासत राहा
- आरोग्यदायी आहार घ्या, धूम्रपान टाळा
- दररोज थोडा व्यायाम करा
- ताण कमी ठेवा आणि पुरेशी झोप घ्या
असं केल्याने तुम्ही तुमचं हृदय फक्त आजच नव्हे, तर आयुष्यभर तरुण आणि निरोगी ठेवू शकता.