(Boy Dies After Banana Gets Stuck in Throat) : तामिळनाडू राज्यात एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. केळी खाताना घशात तुकडा अडकल्यामुळे एका पाच वर्षांच्या मुलाचा जीव गेला. श्वसनमार्ग बंद झाल्याने त्याला अचानक दम लागायला सुरुवात झाली. तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना इरोड जिल्ह्यातील अन्नाई सत्य नगर भागात घडली. मणिक्कम यांचा मुलगा साईशरण हा घरी केळी खात असताना अचानक त्याचा तुकडा श्वासनलिकेत अडकला. श्वास घेणे कठीण झाल्याने घरातील मंडळी घाबरून गेले. शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत असताना मार्गातच त्याचा मृत्यू झाला. आईच्या हातातच त्याने प्राण सोडल्याचे सांगितले जाते. करूंगलपलयम पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.
कुटुंबाची परिस्थिती आणि अपघाताचा क्षण
साईशरणचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. कामानिमित्त दोघेही दिवसभर घराबाहेर असल्याने मुलं आजीसोबत राहतात. मंगळवारी रात्री आजीने त्याला केळी खायला दिली. पण त्यातील तुकडा थेट श्वासनलिकेत गेल्याने गुदमरल्यासारखा आवाज आला. कुटुंबीयांनी ताबडतोब त्याला उपचारासाठी धाव घेतली, पण वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने त्याला वाचवता आले नाही. प्राथमिक उपचार वेळेवर मिळाले असते तर मुलगा जिवंत राहू शकला असता, असे डॉक्टरांचे मत आहे.
लहान मुलांना फळ देताना काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
डॉक्टरांच्या मते, चिमुकल्यांना फळे देताना त्याचे छोटे तुकडे करून देणे अत्यावश्यक असते. त्याचबरोबर, कोणाचा घशात काही तुकडा अडकल्यास त्यांच्या पाठीवर हलकेच ठोके द्यावेत, ज्यामुळे अडलेले पदार्थ बाहेर येतात. अशा प्रसंगात तत्काळ मदत मिळणे फार महत्त्वाचे असते.