मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत 680 गावांना अतिवृष्टीचा जबर फटका दिला आहे. गेल्या चोवीस तासांत संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांतील 34 महसूल मंडळांत 65 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 17 महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.
जालन्यात पावसाचा कहर
जालना जिल्ह्यात परतूर आणि श्रीष्टी या ठिकाणी सर्वाधिक 102 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जालना शहर व ग्रामीण भागात 66 मिमी, मंठा येथे 73 मिमी, रांजणी 79 मिमी, शेलगाव 69 मिमी अशा प्रमाणात पाऊस कोसळला.
8 जिल्ह्यांत 23.6 मिमी सरासरी पाऊस
27 ते 28 मे दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला असून विभागातील सरासरी पावसाचे प्रमाण 23.6 मिमी इतके नोंदवले गेले. त्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक 44 मिमी, नांदेड 30 मिमी, हिंगोली 27 मिमी, बीड 26 मिमी, लातूर व परभणी प्रत्येकी 22 मिमी, तर धाराशिव जिल्ह्यात 10 मिमी पावसाची नोंद झाली.
मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद
यंदा मे महिन्यातील 28 पैंकी तब्बल 16 दिवस पाऊस पडला असून गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या दिवस पाऊस पडल्याची नोंद आहे. मे महिन्यांत सरासरी 177 मिमी पाऊस झाला असून हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 1389 टक्केने अधिक आहे.
अतिवृष्टी झालेली प्रमुख गावे – जिल्हानिहाय माहिती
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
चित्तेपिंपळगाव – 74 मिमी
करमाड – 66 मिमी
कचनेर – 66 मिमी
आडूळ – 80 मिमी
लातूर जिल्हा
हरंगुळ – 68 मिमी
कासारखेडा – 66 मिमी
वडवळ – 70 मिमी
अष्टा – 93 मिमी
नांदेड जिल्हा
येवती – 65 मिमी
जहूर – 75 मिमी
गोळेगाव – 66 मिमी
हिंगोली जिल्हा
कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, वारंगा – 65 मिमी ते 89 मिमी
हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांसाठीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.