महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक भागात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आज, 20 ऑगस्ट रोजीदेखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, मुंबईत दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
मुंबई, उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट आणि चंद्रपूर या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत मध्यम ते जोरदार सरींची शक्यता कायम असली तरी पालघर आणि नाशिकच्या घाट विभागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रायगड आणि पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेनेही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. साताऱ्यात सहा तालुक्यांमध्ये दोन दिवसांची सुट्टी जाहीर झाली आहे. तसेच ठाणे, पालघर आणि लोणावळा परिसरातदेखील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि हवामान विभागाचे अलर्ट लक्षात ठेवूनच बाहेर पडावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.