Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय कोकण, मराठवाडा आणि विदर्भात देखील जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागांत रिमझिम सरी सुरु होत्या, मात्र आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि नांदेड तसेच नाशिक घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे गेल्या 24 तासांत तब्बल 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये मात्र 32.8 अंश सेल्सिअस तापमानासह राज्यातील उच्चांक उष्णता नोंदवली गेली.
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पुन्हा गती मिळाली आहे. या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीवर जाणवतो आहे. पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहणार असून, विशेषतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून आणखी सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस काही प्रमाणात दिलासा ठरू शकतो. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.