राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने काही भागांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जाहीर केला आहे. पुणे, सातारा, रायगडसह घाटमाथ्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला आहे. तर, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मुंबईला हवामान विभागानं यल्लो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात पावसाचा कहर
सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून, जावळी व महाबळेश्वर परिसरात तुफान बॅटिंग सुरू आहे. गेल्या 48 तासांपासून जिल्ह्यात धुवांधार पावसाची नोंद होत आहे. साताऱ्याचा सरासरी पावसाचा आकडा 375 मिमीपर्यंत पोहोचला असून, आतापर्यंत 85 टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला चांगली चालना मिळणार असून, शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः घाटमाथ्याच्या भागात प्रवास करणाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही वाचा