राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी कायम आहे. जरी मॉन्सूनचा काळ अधिकृतपणे संपला असला, तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा हवामानात बदल दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, 20 ते 25 ऑक्टोबरदरम्यान देशातील अनेक भागांमध्ये पाऊस सुरू राहणार आहे, ज्यामुळे दिवाळीचा आनंद थोडा ओलसर होणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आधीच जोरदार पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे पिक पाण्यात वाहून गेले असून, नुकसानीचे प्रमाण प्रचंड आहे. आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक, लक्षद्वीप आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नांदेड येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि लातूर भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
IMD च्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल भागात हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. याचबरोबर, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा राज्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत आहेत दरम्यान, पुढील तीन दिवसांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील. हवामान खात्याने सांगितले आहे की, 24 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढू शकते.
यामुळे दिवाळीतही नागरिकांना छत्री आणि रेनकोटची साथ घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, शेती आणि प्रवासासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.