मुंबई व उपनगरांमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेच्या CSMT-ठाणे मार्गावरील सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या. पहाटे 4 वाजल्यापासूनच या मार्गावर अडथळे निर्माण झाले होते. शहाड-आंबिवलीदरम्यान तांत्रिक बिघाड आणि ट्रॅकवर पाणी साचल्याने परिस्थिती गंभीर झाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लोकलसाठी पाण्याची कमाल मर्यादा 6 इंच असते, मात्र काही ठिकाणी ती 19 इंचांपर्यंत पोहोचल्याने सेवा बंद करावी लागली.
दररोज सुमारे 1,810 लोकल धावणाऱ्या मध्य रेल्वेवर सकाळी 11 वाजेपर्यंत 800 हून अधिक गाड्या रद्द झाल्या. तसेच 16 एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावल्या, 14 पूर्णपणे रद्द तर 5 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी CSMT, ठाणे, दादर, वाशी अशा प्रमुख स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू करण्यात आले. पश्चिम रेल्वेवरही पावसाचा परिणाम जाणवला. दादर, माटुंगा रोड, माहीम, वसई, नालासोपारा, नायगाव या भागांत पाणी भरल्याने ‘पॉईंट फेल्युअर’ झाले. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही संथगतीने धावल्या. दरम्यान, लोकल बंद झाल्याने अनेक प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवरून चालण्याचा मार्ग अवलंबला.
मुसळधार पावसाचा फटका विमान सेवेलाही बसला. गेल्या 48 तासांत 250 पेक्षा जास्त विमानांना उशीर झाला. त्यापैकी 155 मुंबईतून उड्डाण करणाऱ्या तर 102 उतरणाऱ्या विमानांचा समावेश आहे. कमी दृष्यमानता आणि धावपट्टीवर पाणी साचल्यामुळे 8 विमाने अहमदाबाद व सूरतकडे वळवावी लागली. काही विमानांना आकाशात 45 मिनिटांहून अधिक वेळ ‘होल्डिंग पॅटर्न’मध्ये घिरट्या घालाव्या लागल्या. संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उड्डाणातील विलंब 20-25 मिनिटांपर्यंत मर्यादित झाला. मुंबई विमानतळावर आणखी एक प्रकार घडला. प्रवाशांना ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी Indigo ची एक रिकामी बस अचानक पेटली. तात्काळ अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवाशांनी BEST बसचा आधार घेतला. दादर TT बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. काही प्रवाशी चेंबूर, ठाणे, कल्याण-डोंबिवलीकडे निघाले होते. अनेक बसमार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले. काही बसेस वळसा घालून गंतव्यस्थानावर पोहोचत होत्या. सकाळी कार्यालयासाठी निघालेल्या चाकरमान्यांना सुट्टी जाहीर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परतीचा प्रवास करावा लागला. मात्र रेल्वे सेवा ठप्प झाल्याने आणि रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांचा प्रवास अधिकच कष्टदायक झाला.
सततच्या पावसामुळे मुंबईतील जीवन विस्कळीत झाले आहे. लोकल, विमान व रस्ते वाहतूक तिन्ही ठिकाणी मोठे अडथळे निर्माण झाले असून, नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. रेल्वे प्रशासन व विमान कंपन्यांनी हेल्पडेस्क व सूचना जारी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असला तरी, हवामान सामान्य होईपर्यंत प्रवाशांचे हाल कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते.